मुंबई : गणपती विसर्जनासाठी मालाड (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव आता दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळे दिंडोशी परिसरातील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी अशी ओळख असलेल्या या तलावात आॅक्सिजनयुक्त स्वच्छ पाणी सोडण्यात आले. यामुळे कुरारवासीयांची मोठी सोय झाली आहे. मालाड पूर्व हायवेजवळ असलेल्या कुरार व्हिलेज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तलावाचे गेल्यावर्षी म्हाडातर्फे सुशोभिकरण करण्यात आले. पाणी साठण्याच्या जागी सिमेंट काँक्रिट ओतल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद झाले. पाणी झिरपणे बंद झाल्यामुळे या पाण्यात शेवाळ साठून पाण्याला हिरवा रंग आला होता. शिवाय पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जीवजंतू वाढून पाण्याला प्रचंड दुर्गंधी आली होती. लाखो रुपये खर्चूनही काम न झाल्याने येथे येणारे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. या बाबीची दखल घेत आमदार सुनील प्रभू आणि पालिका अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. त्यानंतर तलावाच्या पाण्यात आॅक्सिजन आणि स्वच्छ पाणी सोडण्याचे तसेच गणपती विसर्जनासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रभू यांनी दिले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कायमस्वरूपी फिल्टरेशन बसवण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी नगरसेवक प्रशांत कदम, सुनील गुजर, गणपत वारिसे यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या तलावाचे हस्तांतरण महानगर पालिकेकडे केल्यास त्याचे सुशोभिकरण आणि स्वच्छता राखणे सोयीचे होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे या तलावाचा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र केवळ गणेशोत्सवापुरतेच नव्हे, तर कायमस्वरूपी या तलावाकडे लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली (प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर तलाव झाला दुर्गंधीमुक्त
By admin | Published: September 21, 2015 2:35 AM