मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकांतवासात जात असल्याची पोस्ट केली होती. या पोस्टनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं. मात्र अखेर खासदार अमोल कोल्हे समोर आले आहेत. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियात सुरु असलेल्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मानसिक थकवा येणं, सतत धावपळीतून याकडे पाहणं गरजेचे होते. मानसिक थकव्याची जाणीव झाल्यानं मी हा निर्णय घेतला होता असं अमोल कोल्हे(Dr Amol Kolhe) म्हणाले.
याबाबत बीबीसी मराठीच्या मुलाखतीत अमोल कोल्हे म्हणाले की, मी या काळात प्राणायम केले. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही उपाय केले जातात. मानसिक आजारासाठी काऊन्सिलिंगची गरज भासते. लोकांमध्ये मानसिक तणावाबद्दल जनजागृती व्हायला हवी. माझ्या पोस्टकडे खूप निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहिलं गेले त्याचे नवल वाटते असं त्यांनी सांगितले.
तसेच मी कुठलाही फेरविचार करत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना दिलेली आश्वासनं, संकल्पना याबाबतही फेरविचार करणं गरजेचे आहे. पुढच्या काळात काही काळात अनेक उलगडा होत जाईल. एकांतवासात गेल्यानंतर ज्या बातम्या झाल्या. त्या प्रतिक्रिया आल्या. मानसिक आरोग्याची गरज आहे का? तर हे असू शकतं. मला राजकारणाचा कंटाळा आला असता तर माझ्या संकल्पना, योजना इतक्या उत्साहाने मांडल्या नसत्या असं अमोल कोल्हे म्हणाले.
पक्ष बदलण्याचा विचार आहे का?
मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती. मात्र इतरांनी अनेक तर्क वितर्क लावले. मी राजकारण सोडणार? पक्ष बदलणार? याचं मी स्पष्टीकरण काय द्यावं? प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तर्क लावले. मला विचारमंथन करायचं होतं. येणाऱ्या काळात जे करायचं होतं त्याचा विचार मी एकांतवासात केला. राजकीय सन्यास, पक्षांतर असा कुठलाही अँगल नाही असं स्पष्टपणे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
अमोल कोल्हेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
सिंहावलोकनाची वेळ - गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा करणार आहे. त्यासाठीच आपण एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू... नव्या जोमाने, नव्या जोशाने!! चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी तळटीप सुद्धा त्यांनी लिहिली होती.