चेतन ननावरे,
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रस्ते विभागामधील ३४ रस्त्यांच्या घोटाळ््याप्रकरणी महापालिका अभियंत्यांसह कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले. मात्र लालफितीच्या कारवाईत भ्रष्टाचार झालेल्या रस्त्यांची डागडुजी रखडली आहे. परिणामी लोकांना या खड्ड्यांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.‘ई’ वॉर्डमधील या मार्गाची पाहणी ‘लोकमत’ने केली. त्यावेळी रस्त्यावर सहा ते सात फूट लांबीचे व रूंदीचे खड्डे असल्याचे निदर्शनास आले. आजघडीला संपूर्ण ‘ई’ वॉर्डमध्ये सुमारे ५० खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा आहे. याउलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर २५हून अधिक खड्डे असल्याचे दिसले. यावरून महापालिकेचा दावा किती फोल आहे, याचा प्रत्यय येतो.डॉ. आंबेडकर मार्गावरील खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली असता, त्यांनी हा मार्ग रस्ते विभागांतर्गत येत असल्याची माहिती दिली. यावर हा रस्ता येत्या वर्षभरात नव्याने बांधणार असल्याचे रस्ते विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय तात्पुरती डागडुजी म्हणून याठिकाणी पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे काम प्रशासन करत असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.>डांबर, सिमेंट आणि पेव्हर ब्लॉक...या मार्गावरील वेगवेगळ््या ठिकाणचे खड्डे बुजवताना एकाच पॅचवर सिमेंट, डांबर आणि पेव्हर ब्लॉकचा वापर केल्याचे दिसले. काहीच काळात तात्पुरत्या स्वरूपात बुजवलेले येथील खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. त्याचा त्रास वाहतूक कोंडीच्या रुपात वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांनाही होत आहे.>गेला पैसा कुणीकडे?भायखळ््यापासून सुरू होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुढे लालबाग, करीरोड, परळ, दादरमार्गे किंग्ज सर्कलला जोडला जातो. हा लांब रस्ता दोन टप्प्यांत बांधण्यासाठी आर.के.मदानी या कंत्राटदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९३ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम खर्च केली. मात्र भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या ३४ रस्त्यांमध्ये डॉ. आंबेडकर मार्गावरील भायखळा हद्दीतील मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही.>खात्यांतर्गत चौकशीशिवाय कारवाई नकोमुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या कृती समितीने बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. महापालिकेतील रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी खात्यांतर्गत चौकशी झाल्याशिवाय अभियंत्यांवर कारवाई नको, अशी मागणी महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन कृती समितीने केले आहे. रस्ते प्रकरणात जनरल कंडिशन्स आॅफ कॉन्ट्रॅक्ट मधील कलम क्रमांक ६९ व ८७ च्या तरतुदीनुसार संबंधित अभियंता कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम परत घेऊ शकतो, असे कृती समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकचे अधिदान झालेली रक्कम वसूल होऊ शकते. परिणामी निलंबीत केलेल्या दोनही कार्यकारी अभियंत्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेण्याची मागणी कृती समितीने केली आहे.>रस्ते विभागाकडे पाठपुरावाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा रस्ते विभागांतर्गत येतो. त्यामुळे त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम रस्ते विभागाचे आहे. माझ्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तरीही आंबेडकर मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रस्ते विभागाकडे पाठपुरावा करत आहे.- रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेवक