ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. सीबीआयकडे तपास गेल्याने दाभोलकरांची मारेकरी पकडले जातील अशी आशा निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात भररस्त्यात हत्या झाली होती. या हत्येचा तपास पुणे पोलिस करत होते. मात्र नऊ महिन्यांचा कालावधी लोटूनही मारेकरी मोकाट होते. या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. 'आम्ही दोन आरोपींना पकडले. मात्र त्यांच्याविरोधात सबळ पुरावे जमा करता आले नाही. तसेच तपासही पुढे सरकला नाही' असे राज्य सरकारच्या वकिलांनी हायकोर्टासमोर सांगितले. यानंतर हायकोर्टाने दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या नेतृत्वाखाली दाभोलकरांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरु असून सीबीआयकडे याचा तपास द्यायची गरज नाही असे राज्य सरकारने गुरुवारी हायकोर्टाला सांगितले होते. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने राज्य सरकार व गृहखात्याला दणकाच दिला आहे.