पुणे - पुण्यातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कंपोझिशनसाठी आणि दुसरे पेटंट छोट्या किडनी स्टोन्स आणि त्याचे पुनरागमन रोखण्यावरील उपचार यासाठी मिळाले आहे. यासाठी पाटणकर यांना सन २०१५ मध्ये दोन अमेरिकन व एक भारतीय पेटंट देखील मिळाले आहे.सध्या जगभरातील ३७,०८० पेटंट्सपैकी ३०९९ पेटंट्स हे स्वतंत्ररीत्या व्यक्तींच्या नावावर आहेत. त्यातील ७०-८० टक्के पेटंट्स हे चिनी पारंपरिक औषधांशी निगडीत आहेत. भारत आजही पारंपरिक औषधांवरील संशोधनात मागे आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पारंपरिक औषधांबद्दलचा ज्ञानाचा साठा आहे, जो की अजूनही सर्वांना परिचित नसल्याचे पाटणकर यांनी येथे सांगितले. डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, या पद्धतीने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामुळे आता लवकरच ही औषधे बाजारात आणण्याचा विचार करत असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा फायदा होईल. पारंपरिक वैद्यकीय शास्त्र हे पुरेशा दस्तऐवजांअभावी (डॉक्युमेंटेशन) व आधुनिक शास्त्रीय पद्धतींनी केलेल्या संशोधनाअभावी कमी पडत आहे. म्हणून लोकांना त्याचा पूर्ण फायदा घेता येत नाही. हे पेटंट म्हणजे वैयक्तिक यश नाही तर विज्ञानाच्या संबंधित शाखेतील संशोधनास निर्णायक दिशा देणारे ठरणार आहे.
पुण्यातील डॉ. पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट, भारतासाठी अभिमानास्पद बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:27 PM