चंद्रपूर : स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक, संवेदनशील लेखिका, वक्त्या व सन्मित्र महिला बँकेच्या माजी अध्यक्ष व लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या पत्नी प्रा. डॉ. जया द्वादशीवार यांचे सोमवारी सायंकाळी चंद्रपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. एक दीड वर्षांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर सुरुवातीला नागपूर व नंतर पुणे येथे उपचार करण्यात आले. मृत्यूशी झुंज देत असतानाच सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. याच काळात त्यांनी प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक कमला दास यांच्या काव्यावर अभ्यास करून आचार्य पदवी प्राप्त केली होती. तसेच इंग्रजी, हिंदीसह इतर भाषांमधील कविता त्यांनी मराठी भाषेत अनुवादित केल्या आहेत. विविध वृत्तपत्रांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता भिवापूर वॉर्डातील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर बिनबा गेट शांतीधाम येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी जया द्वादशीवार यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
डॉ. जया द्वादशीवार यांचे निधन
By admin | Published: March 21, 2017 3:17 AM