- जयंत धुळप, अलिबाग
मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या संशोधनात सहकारी असलेला आणि पोखरणच्या अणुचाचणीच्या वेळी त्यांच्यासोबत असलेला मराठी माणूस दुसरा तिसरा कोणी नसून, अलिबागच्या तत्कालीन इंडस्ट्रियल हायस्कूलमधील १९७३ च्या बॅचचा आपला वर्गमित्र उदय वामन उर्फ नाना देशमुख होता, हे कळल्यावर या बॅचमधील अनेकांचे ऊर अभिमानाने भरून आले. निमित्त होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे. अलिबागमधील पूर्वीच्या मिशनरी आणि आता कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंडस्ट्रियल हायस्कूलमधील १९७३ बॅचचा महेश्वर देशमुख,अरुणकुमार धुळप, म.ना.पाटील आणि सुनील कर्वे या वर्गमित्रांनी स्नेहमेळाव्याचा योग जुळवून आणला. डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, व्यावसायिक, सरकारी सनदी अधिकारी, भारतीय लष्कर, उद्योग, कला, संगीत आदी विविध क्षेत्रांत देशात-परदेशात कार्यरत वयाची पन्नाशी-साठी ओलांडलेले वर्गमित्रांसह तत्कालीन वर्गशिक्षिका विजया चाफेकर, विजया चव्हाण आणि सदानंद वीरकर हे शिक्षकवृंदही या वेळी उपस्थित होते. शाळेचे तत्कालीन शिपाई अण्णा शिंदे यांनी शाळेची घंटा वाजवली आणि बरोबर ११ वाजता आपल्या जुन्या अकरावीच्या वर्गातील बाकांवर तब्बल ४४ वर्षांनी वर्गमित्र भेटले. त्या वेळी वर्गशिक्षिका विजया चाफेकर बाई लगेच वर्गात यायच्या, तशा आजही त्या वर्गात आल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली. आपले नाव पुकारताच ‘हजर’ म्हणताना, अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या वेळी चव्हाणबाईही आल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिल्यावर, आपले विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर असल्याचे पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सर्वांना भावली ती आपला वर्गमित्र उदय वामन तथा नाना देशमुख याने, अलिबागच्या या शाळेतून देशाच्या संरक्षण क्षेत्रात घेतलेली भरारी. अलिबाग पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस जमादार वामन देशमुख यांचा नाना हा मुलगा. पोलीस हेडकॉर्टर आणि परिसरातच लहानाचा मोठा झाला. अकरावीनंतर कॉमर्स ग्रॅज्युएशन केलेल्या नाना देशमुखांनी मुंबईत नोकरी शोधली, पण त्यात ते रमले नाहीत. त्यांनी थेट साताऱ्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि इंजिनीअरिंगची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, स्वत:चा कारखाना सुरू केला. त्यातल्या शास्त्रशुद्धतेमुळे त्यांचा संपर्क थेट तत्कालीन शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांच्याशी आला आणि त्यांना यशाचे अग्निपंख गवसले. त्यांचे ते विश्वासू सहकारी झाले. आता नाना ‘मेक इन इंडिया’चे सदस्यडॉ.कलामांच्या संशोधनातून साकारलेल्या ‘पृथ्वी’, ‘आकाश’, ‘नाग’ आणि ‘बह्मा’ या भारतीय क्षेपणास्त्रांचे महत्त्वाचे सुटे भाग तयार करण्याची संधी नाना देशमुखांना मिळाली. त्यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याने, ते कलाम यांच्या गळ्यातले ताईत बनले. नाना देशमुख यांच्या संशोधनात्मक कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील ‘मेक इन इंडिया’ या समितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. गुरुजनांच्या संस्कारांमुळे प्रयत्ंनांनाभक्कम बळ मिळत असल्याचे, देशमुख यांनी सांगितले.