औरंगाबाद : प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या घराजवळील १०० फूट अंतरावरील जुन्या विहिरीत टॉवेलमध्ये गुंडाळून टाकलेले डंबेल्स आणि किचनमधील चाकू तब्बल ४८ तासांच्या अथक मेहनतीने सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यासाठी महापालिकेने नेमलेल्या खासगी कंत्राटदाराचे १२ कामगार रात्रंदिवस मेहनत घेत होते. खून करण्यासाठी विधिसंघर्षग्रस्त बालकाने वापरलेले डंबेल्स तब्बल ७ किलो वजनाचे भरले.ही शस्त्रे विहिरीतून बाहेर काढण्यापूर्वी विधिसंघर्षग्रस्त बालकाला घटनास्थळी आणण्यात आले. त्यानंतर विहिरीतून डंबेल्स, चाकू आणि टॉवेल बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रे पंचनामा करून सीलबंद करण्यात आली. रक्ताने माखलेला टॉवेल त्यापूर्वी सुकविण्यात आला. डंबेल्सचे वजन करण्यासाठी एका किराणा दुकानातून इलेक्ट्रॉनिक काटा आणण्यात आला होता. त्या काट्यावर वजन मोजले तेव्हा ते ७ किलो भरले. किचनमध्ये वापरण्यात येणारा चाकूही विहिरीत सापडला.डॉ. शिंदे यांचा मागील सोमवारी पहाटे खून झाला होता. पोलिसांच्या विविध पथकांनी खुनाचा उलगडा करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले. शुक्रवारी रात्री विधिसंघर्षग्रस्त बालकाने खून केल्याची कबुली दिली होती. या कबुलीत त्याने खून करण्यासाठी वापरलेला चाकू, डंबेल्स हे रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये गुंडाळून घराजवळील विहिरीत टाकल्याचेही सांगितले. यानुसार पोलिसांनी शनिवारी सकाळीच विहिरीतील पाणी उपसा करण्यास सुरुवात केली होती.हे प्रकरण हाय प्रोफाइल बनल्यामुळे प्रसारमाध्यमांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे परिसर सील करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना विहिरीजवळ येण्यास मज्जाव केला होता. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला. तब्बल ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर गाजलेल्या खुनाच्या घटनेतील महत्त्वाचे पुरावे हाती लागले....अन् तो शांतपणे चालत आलात्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला विहिरीत शस्त्रे टाकल्याचे दाखविण्यासाठी जेव्हा आणण्यात आले, तेव्हा त्याच्या अंगात पांढरा टी शर्ट, जिन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला होता. त्यात चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. शांतपणे चालत आलेल्या बालकाने विहिरीत टाकलेली शस्त्रे खुणेने दाखवली. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या गाडीत बसविण्यात आले. तेथेही तो शांतपणे बसून होता. सोबतच्या अधिकाऱ्यांसही तो चकार शब्द बोलला नाही.आरोपीला सकाळी उचललेडॉ. शिंदे यांच्या खुनातील विधिसंघर्षग्रस्त बालकाला सोमवारी सकाळीच एका पथकाने घरातून ताब्यात घेतले होते. शस्त्र सापडल्यानंतर त्या बालकाला शस्त्र टाकलेल्या विहिरीवर गुन्हे शाखेच्या गाडीतून आणण्यात आले. त्याने विहिरीत टाकलेली शस्त्रे बोटानेच दाखविली. ही ओळख परेड इनकॅमेरा करण्यात आली.
प्रा. डॉ. राजन शिंदे खूनप्रकरण: सात किलाेच्या डंबेल्सने खून; अल्पवयीन मुलाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 8:29 AM