मुंबई - लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाचा उतराई होण्यासाठी सतत कार्य करत राहणे हे तुमचे आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचा आपल्यावर सर्वात पहिला हक्क असल्याचे सांगत माजी खासदार आणि पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पुत्र राणाजगजितसिंह यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाला पाठिंबाच दिला आहे. त्यामुळे राना जगजितसिंह भाजपमध्ये जाण्यास सज्ज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पद्मसिंह पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून पुत्राच्या संभाव्य राजकीय निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.
पद्मसिंह पाटील म्हणाले की, राणाजगजितसिंह, तुम्ही मागील १५ वर्ष एक लोकप्रतिनिधी म्हणून जे प्रामाणिक कार्य करत आहात, लोकहितासाठी जे प्रयत्न करत आहात ते पाहून अत्यंत समाधान वाटते आहे. एका वडिलांला याहून मोठा आनंद काय असू शकतो ? आपण स्वीकारलेले लोकसेवेचे काम, आपण घेतलेला वसा आपला मुलगा जीवितकार्य म्हणून, संकल्प म्हणून पुढे चालवत आहे. नुसता चालवतच नाही तर यशस्वीपणाने केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाचा उतराई होण्यासाठी सतत कार्य करत राहणे हे तुमचे आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे. आपल्याला ज्यांनी परिवारातील सदस्याप्रमाणे प्रेम दिले, जे लोकहिताच्या कार्यात सहभागी झाले, ज्यांनी आपल्याला घडविले, आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, आपल्याला सांभाळले, संघर्षात साथ दिली, प्रत्येक हाकेला प्रतिसाद दिला, सुखदु:खात आपल्याला सहभागी करून घेतले, अश्या आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचा आपल्यावर सर्वात पहिला हक्क आहे. त्यांच्या हितासाठी जो कोणता निर्णय आवश्यक वाटत असेल तो घेतलाच पाहिजे. तुमच्यातील प्रामाणिकपणा हीच सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्यातील याच गुणाचा मला सर्वाधिक अभिमान आहे, असही डॉ. पाटील म्हणाले.
राणा जगजितसिंह यांनी आधीच ३१ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात आता पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यावरून राणा लवकरच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेणार असंच दिसत आहे.