भिवंडी:भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेचे डॉ. संजय पाटील यांचा विजय झाला आहे . त्यांच्या विजयाने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत महा विकास आघाडीने वर्चस्व कायम राखले आहे.
विद्यमान सभापती विशूभाऊ म्हात्रे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली. यावेळी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार डॉ.संजय पाटील यांना ९ मते मिळाली तर भाजपचे दयानंद पाटील यांना ८ मते मिळाली. एकूण १८ सदस्य संख्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी एक सदस्य गैरहजर असल्याने १७ सदस्यांनी यावेळी मतदान केले. गुप्त पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी म्हणून ठाणे सहाय्यक निबंधक शामकांत साळुंके यांनी व कृषी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे यांनी यावेळी प्रशासकीय कामकाज पाहिले.
बाजार समितीच्या सभापतीपदाच्या झालेल्या अटी- तटीच्या लढतीत भाजपचा निसटता पराभव झाला असून महाविकास आघाडीचे डॉ.संजय पाटील यांचा एका मताने मताने विजय झाला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ.संजय पाटील यांचे अभिनंदन केले. सदर प्रसंगी शिवसेनेचे इरफान भुरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी,मजुर फेडरेशनचे मा.अध्यक्ष पंडित पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.