ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध जठरांत्रमार्ग विकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) तसेच हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांना रविवारी प्रतिष्ठेच्या ४४व्या धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल धन्वंतरी फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. नागेश्वर रेड्डी यांना (ताजमहाल हॉटेल, मुंबई येथे) हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बी. के. गोयल, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. लेखा आदिक-पाठक, डॉ जीवराज शहा, वैद्य सुरेश चतुर्वेदी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अलीकडच्या काळात निवासी डॉक्टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉक्टर रुग्ण संबंधांचा प्रश्न पुनश्च ऐरणीवर आला असल्याचे नमूद करून डॉक्टरांच्या रक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी बोलताना केले. डॉक्टर आणि रुग्णांचे नाते परस्पर विश्वासाचे असले पाहिजे, असे सांगताना डॉक्टरांनी रुग्णांशी तसेच त्यांच्या संबंधितांशी सहानुभूतिपूर्वक वागले पाहिजे, असे ते म्हणाले. कित्येकदा संवादाच्या अभावामुळे किंवा तुटक संवादामुळे डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात असे सांगून संवाद आणि रुग्णांप्रती सहानुभूती यातून विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकते असे त्यांनी सांगितले. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणासोबत मानव्यशास्त्र हा विषय शिकविण्याबाबत देखील विचार व्हावा अशी त्यांनी सूचना केली.
डॉ. नागेश्वर रेड्डी यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार प्रदान
By admin | Published: March 26, 2017 4:25 PM