कोल्हापूर, दि. 14- शहरासह उपनगरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या तुफानी पावसाने शहरात सगळीकडे दाणादाण उडविली आहे. बुधवारी रात्री 11च्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तसंच 8 चारचाकी, 2 रिक्षा आणि 10 ते 12 दुचाकी वाहून गेल्याचंही समजतं आहे. पावसाने सखलभाग जलमय होवून शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. गटारी तुंबल्याने ओढे, नाल्यांचे पाणी- वस्त्यांमध्ये शिरलं. कळंबा, पाचगाव, उजळाईवाडीसह काही उपनगरांमध्ये गुडघाभर ते कमरेपर्यंत पाणी होतं, असं नागरिकांनी सांगितलं. काही ठिकांणी घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत.
दरम्यान, येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.