पुण्यात नाट्यमय घडामोडी घडणार! दोन्ही पवार एकाच मंचावर येणार, टोले की टीका...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:15 PM2024-01-03T14:15:42+5:302024-01-03T14:16:35+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य समेलन होऊ घातले आहे. पूर्वी शरद पवार ज्या कार्यकमांना जायचे त्या कार्यक्रमांना जाणे अजित पवार टाळायचे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सध्याचा काळ हा राजकीय तणावातून जात आहे. दिवाळीत पाच ते सहा वेळा एकत्र आलेले काका-पुतणे पवार यांच्यातील लढाई आता त्यांच्या शिलेदारांपर्यंत येऊन पोहोचली आहे. बारामतीत शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा अजित पवारांनी केली आहे. अशातच येत्या महिनाभरात राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांवरील याचिकेवरील निकालही येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे चित्र स्पष्ट होणार असल्याने एकमेकांना खुले इशारे देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच दोन्ही पवार एकाच मंचावर येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसू लागली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य समेलन होऊ घातले आहे. पूर्वी शरद पवार ज्या कार्यकमांना जायचे त्या कार्यक्रमांना जाणे अजित पवार टाळायचे. परंतु, या नाट्यसंमेलनाला दोन्ही पवारांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी दोघेही एकमेकांवर टीका-टिपण्णी करतात की कोपरखळ्या मारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन्ही पवार फाटाफूट झाल्यापासून यापूर्वी कधी एकत्र आले नाहीएत असे नाहीय. दौड तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाला ते एकत्र आले होते. परंतु, तेव्हा अजित पवारांनी काकांसमोर जाणे टाळले होते. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचे प्राबल्य असलेला भाग आहे. त्यांना त्यांचे नेते, कार्यकर्ते टिकवून ठेवायचे आहेत. यामुळे निवडणुकीच्या मोसमात काकांवर उघड टीका करणे अजित दादांना आतातरी शक्य नाहीय.
२५ वर्षांपूर्वी या शहरात नाट्यसंमेलन झाले होते. तेव्हा शरद पवारांनी आयोजनाची जबाबदारी घेतली होती. आता अजित पवार आणि उदय सामंत यांनी जबाबदारी घेतली आहे. उदय सामंत हे एकेकाळचे शरद पवारांचे शिलेदार आहेत. कोकणातील राजकीय परिस्थितीमुळे सामंतांनी ऐन निवडणुकीवेळी काकांच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेत उडी मारली होती. आता ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. तर अजित पवार हे राष्ट्रवादीवर दावा ठोकून भाजपासोबत सत्तेत आहेत.