नवी दिल्ली : महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रथमच रेल्वे ड्रोनचा वापर केला असून, आता अन्य निर्माणाधीन योजनांवर निगराणी ठेवण्याच्या उद्देशाने या उडत्या मानवरहित हवाई वाहनाचा वापर केला जाणार आहे.डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोरच्या (डीएफसी) निरीक्षणासाठी पहिल्यांदाच सुनियोजितरीत्या ड्रोनचा वापर झाला. हा प्रयोग अन्य अंमलबजावणी होत असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. रेल्वे अपघातानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीही रेल्वेने हवाई सर्वेक्षणाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. ड्रोन हे खरे तर उडता रोबो आहे. तो सुदूर नियंत्रित सॉफ्टवेअरच्या आधारे उडविला जातो. जीपीएसशी (ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टीम) तो जोडलेला असतो. हवाई सर्वेक्षणासाठी एका खासगी आॅपरेटरकडून ड्रोन तीन हजार प्रति कि.मी. या दराने भाड्याने घेण्यात आले होते. सध्या दुहेरीकरण आणि नवे मार्ग अशा १७० प्रकल्पांचे काम सुरू आहे. दुर्गावती- सासाराम डीएफसीच्या संबंधित खंडाचे काम पूर्ण झाले. हा कॉरिडोर संचालित होण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा मंजुरीची प्रतीक्षा आहे. (वृत्तसंस्था)
रेल्वे प्रकल्पावर ड्रोनद्वारे नजर
By admin | Published: April 19, 2016 4:28 AM