मुंबई : संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राची एक इंच भूमीदेखील वेगळी होऊ देणार नाही. मूठभर लोक महाराष्ट्र तोडू पाहत आहेत. हे मूठभर लोक आईच्या पाठीवर नव्हे तर कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शनिवारी मातोश्री या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका घेणाऱ्यांंचा जोरदार समाचार घेतला. काही मूठभर लोकांना वेगळा विदर्भ हवा आहे. त्यांची इच्छा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हे मूठभर लोक आईच्या पाठीवर नव्हे तर कुशीवर वार करणाऱ्यांंची औलाद आहेत. यंदाचा महाराष्ट्र दिन अखंड महाराष्ट्रासाठी साजरा व्हावा. महाराष्ट्राची एक इंच भूमीदेखील वेगळी केली जाणार नाही या इच्छेने प्रत्येकाने हा दिन साजरा करावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. मुंबईतील बेस्टचे ५० बस मार्ग रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बेस्टचे हे मार्ग रद्द केल्यास सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास सोसावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सदर मार्ग रद्द होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पालिकेतील रस्ते घोटाळ्याबद्दल बोलणे विरोधकांचे कामच आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. तिसऱ्या आघाडीबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला काही बोलायचे नाही. तिसऱ्या आघाडीची जेव्हा वेळ येईल त्या वेळी पाहू, असेही ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही
By admin | Published: May 01, 2016 2:02 AM