सिन्नर (नाशिक) : समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढाई कोणा एकाची नसून ती सर्वांची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही, असे सांगत सरकार सोबत असहकार करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.समृध्दी महामार्गााला विरोध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे गाव एकवटले असून समृध्दी विरोधातील आंदोलनाचे हे गाव केंद्रबिंदू झाले आहे. त्यापार्श्वभूमीमुळे शिवडे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात राहतील. त्यामुळे समृध्दी महामार्गात ज्याची जमीन जात नाही अशा शेतकऱ्यांनीही या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. शेतकऱ्यांमध्ये आत्तापर्यंत भेद पाडून दुसऱ्यांनी फायदा करुन घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांवर ही वेळ येणार आहे. त्यामुळे एकजुटीने लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. समृध्दी शब्द जसा मोठा आहे तसे त्याचे लाभधारकही मोठे असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. २६ तारखेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून समृद्धीबाबत शेतकऱ्यांचा असंतोष मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असेही शेट्टी यांनी सांगितले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही
By admin | Published: April 15, 2017 1:45 AM