बारामती : भाजपाने गेल्या पाच वर्षांत १२५ कोटी जनतेचा भ्रमनिरास केला. ‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली. ‘अच्छे दिन’ नको, पहिले दिन बरे होते, असे म्हणण्याची लोकांवर वेळ आली आहे. भाजपा सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे रयत भवनमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये खात्यावर आणण्यासह विविध स्वप्न दाखविली. त्याला लोकांनी भुलून मतदान केल्याने त्यांचे सरकार सत्तेवर आले. निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची मोदी सरकारने पूर्तता केली नाही. प्रतिवर्षी दिलेले २ कोटी रोजगारांचे आश्वासन हवेत विरले. उलट गेल्या चार-पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळालीच नाही. उलट कांद्यासारखी शेती उत्पादने मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. साखर निर्यात होत नाही. साखरेच्या दरासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते. मात्र, या सरकारला शेतकऱ्यांचे घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला विरोध केला; मात्र केंद्रात सत्तेवर आल्यावर ‘वन नेशन, वन टॅक्स’ अशी घोषणा करीत लागू केला. २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी करआकारणी केली आहे. त्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. व्यापारी वर्ग त्यामुळे नाराज आहे.’’ नोटाबंदीमुळे सगळ्यांचे वाटोळे झाले. सर्जिकल स्ट्राईकचेदेखील राजकारण होत आहे. देशात यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतली नाही. गेल्या साडेचार वर्षामध्ये सर्वाधिक जवान शहीद झाल्याचे पवार म्हणाले.या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती संजय भोसले, सदाशिव सातव, सचिन सातव, किरण गुजर, प्रदीप गारटकर, योगेश जगताप, रोहिणी तावरे, बिरजू मांढरे, संदीप जगताप, सुभाष ढोले, शौकत कोतवाल, जवाहर वाघोलीकर आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचा बेरजेच्या राजकारणाचा सल्लालोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर समन्वय ठेवून बेरजेचे राजकारण करा. आता आठवण आली का आमची, इतके दिवस कोठे होता, अशीही त्यांच्याकडून विचारणा होईल. मात्र, आपण त्यांना बरोबर घेऊन प्रचारात सामील करून घ्या. शिवाय काही भागात दुष्काळाची तीव्रता आहे.पाणी नाही, चारा नाही, सर्वत्र रणरणते ऊन आहे. हाताला काम नाही. तिथेदेखील नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना समजून घेऊन आधार देण्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.ताकाला जायचं अन् भांडं लपवायचं कारण नाहीवाईट वाटून घेऊ नका; मात्र २०१४मध्ये सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा बारामती तालुक्यातील पारवडीसह विविध गावांमध्ये महादेव जानकर यांना झालेल्या मतदानाचे प्रमाण अधिक होते. यावरून काहीतरी चुकीचे घडत आहे, काही लोकांनी समाज डोक्यात घेतल्याचे जाणवत आहे. ताकाला जायचं भांडं लपवायचं कारण नाही. पूर्वीच्या काळात स्वर्गीय जगन्नाथ कोकरे यांचे जावई विजयराव मोरे निवडणुकीला उभे होते. मात्र, कोकरे यांनी ‘जावयाचा मानपान ठेवू, जेवायला घालू, पोशाख करू; पण मत मात्र शरद पवार यांनाच देऊ,’ अशी भूमिका घेतली. खरी निष्ठा अशी असावी, असे अजित पवार म्हणाले.
‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:40 AM