- मिलिंद बेल्हेटळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात. आयत्या वेळचे पाहुणे म्हणून तुमच्यासाठी जेवण रांधलं जातं. पटकन तयार होणारा पिठलंभाताचा बेत. दारच्या पळसाच्या मोठ्या हिरव्यागार पानावर तो ऊनऊन भात नि त्याच्या मधोमध वाढलेलं पिवळंधम्मक सरसरीत पिठलं. तुम्ही आडवा हात मारता. मध्येच पिठल्याचा भुरका घेत झकास दाद देता. पूर्णब्रह्म म्हणजे दुसरं काय हो! खाणं हा तुमचा वीक (की स्ट्राँग) पॉइंट असला की, तुमचं कुठे काहीही अडत नाही. फक्त खायला मिळायला हवं. ते चवीचं असायला हवं. मग, खाण्यासाठी जन्म अपुला...! खाल तसे व्हाल... खाल्ल्या मिठाला जागणे... खा-खा सुटणे... आयत्या पिठावर रेघोट्या... साखरेचे खाणार त्याला... असे सारे वाकप्रचार आणि म्हणी आपोआप चपखल लागू पडतात.अन्न दिन साजरा करताना आपण बदलत्या हवामानानुसार बदलतं पिकवायला पाहिजे, असं यंदा सांगताहेत. तसंच बदलत्या हवामानानुसार म्हणजे हवा बदलेल तसं बदलतं खायला पाहिजे, असाही संदेश द्यायला हवा. माणसानं कसं खातखात राहिलं पाहिजे. तसं केलं नाही, तर मग आसेतुहिमाचल पसरलेल्या या देशातील प्रांत, विभाग, जातींनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं...?जेवण मग ते चुलीवरचं असो की मायक्रोवेव्हमधलं. मातीच्या भांड्यातलं असो की नॉनस्टिक पॅनमधलं. त्यातील पदार्थ, मसाले, बनवण्याच्या पद्धतीतून ते देऊन जातं रसास्वाद.खा, पण बेतानं... पथ्य पाळा, हे सांगणं जरी असलं तरी पंगतीत बयायचं, आग्रह करकरून वाढायचं, आकंठ जेवायचं नि नंतर पोटाला तडस लागली म्हणून शतपावली घाल्त ते पचवायचं, हेही एक शास्त्रच आहे की!काय खाल्लं, यापेक्षा कसं खाल्लं आणि किती खाल्लं, यालाही महत्त्व असतं. हिरव्याकंच केळीच्या पानावर मऊ गुरगुट्या भात, त्यावर तूप किंवा केशरी मेतकूट... सोबत, लालबुंद पोह्याचा पापड किंवा चटकदार लोणचं यांचं वर्णन जरी समोर आलं तरी भूक लागते. एखादी मस्तपैकी उकड, पोहे किंवा उप्पीट... गरमागरम घावणं किंवा अगदीच काही नसलं तरी कुस्करलेली भाकरी, पोळी, पोहे असा कोणताही नाश्ता असो तो आनंद देऊनच जातो. त्यामुळे खाणं हेच जगणं मानायला हवं.माणसं इतकी शास्त्रानुसार वागली असती, तर मग ‘अधिक धान्य पिकवा’सारख्या मोहिमांना तरी काय अर्थ उरला असता! ...आणि लालबुंद झालेल्या तोंडात पान खाऊन गोळा झालेला मुखरस सावरतसावरत गप्पाही रंगल्या नसत्या. त्यामुळे जागतिक अन्न दिनानिमित्त भरपूर खाण्याचा आणि ते पचवण्याचाही संकल्प करायलाच हवा, नाही का?तुम्ही खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता, हा प्रश्नच फिजुल आहे. वेगळ्या चवीचं, वेगळ्या स्वादाचं समोर जे येईल, ते भक्षण करण्याची तुमची क्षमता असेल, तर मग रोजच अन्न दिन होईल साजरा...>जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्मसाधं लोणचं, चटणी, कोशिंबीर, पंचांमृत, रायतं असं डावीकडचे खाणे असो वा त्याच्याशेजारी ठाण मांडून बसणारे भजी, पापड, कुरडयांसारखे कुरकुरणारे पदार्थ असोत... तळणाच्या पदार्थातही भजी म्हटलं की, पाचपंधरा प्रकार समोर येतात... भाताचेही पांढऱ्यापासून वेगळे प्रकार... पोळ्या, भाज्या, रस्सा, उसळी, कढी, सार, आमटी, फतफत्यासारख्या भाज्या, त्यांचे गुण किती वर्णावे? पानाच्या मधोमध बसून तोंड गोड करणारे मिष्टान्न कल्पनेनेच गोडवा आणतात. गोडधोड म्हटलं की, हल्ली खिरीच्या वाटेला पटकन कोणी जात नाही. बंगाली मिठाया, कस्टर्ड, पुडिंग, आइस्क्र ीमच अनेकांना आठवतं. पण खीर, पुरण, आमरस, सुधारस, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी, श्रीखंड, शिरा, लाडू, जिलेबी... पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, सांजापोळी, करंज्या असे नाना प्रकार ज्यांनी पंक्तीला बसवलेत, त्यांनी त्याचा आनंद किती लुटावा?
खाई त्याला खवखवे
By admin | Published: October 18, 2016 4:03 AM