- महेश कुलकर्णी
सोलापूर : मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाइन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत.प्रशासनाच्या सर्वच खात्यांमध्ये ‘स्मार्ट वर्क’ करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून, फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसणारे राज्य उत्पादन शुल्क खातेही या स्पर्धेत मागे राहिलेले नाही. १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपान आणि मद्यविक्रीच्या परवान्यासह १३ आॅनलाइन सेवांना सुरुवात केली आहे.मद्यपान परवाने एक दिवसापासून, वार्षिक आणि आजीवन अशा तीन प्रकारांत मिळतात. उत्पादन शुल्क खाते आणि मद्यविक्रीच्या दुकानात हे परवाने उपलब्ध आहेत. विशेषत: ३१ डिसेंबरला या परवान्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. असा परवाना मिळविण्यासाठी इच्छुकांना उत्पादन शुल्क खात्यात चकरा मारण्याची गरज राहिली नाही. यासाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. ठरावीक शुल्काची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास हे परवाने तातडीने उपलब्ध होतील.उत्पादन शुल्क खात्याकडे परवानगीसाठी येणारे वाइन शॉप (एफएल-२), परमिट रूम (एफएल-३), देशी दारू (सीएल-३), बीअर शॉपी (एफएल/बीआर-२) या महत्त्वाच्या परवान्यांसाठीही आता चकरा मारण्याची गरज नाही. मुंबईस्थित महाआॅनलाइन लि. या कंपनीद्वारे ही राज्यभरातील सर्व जिल्ह्यात आॅनलाइन सेवा पुरविण्यात येणार आहे.