नवी मुंबई : एकीकडे शहरातील क्रीडा संस्कृती जपण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत, तर दुसरीकडे याच शहरातील मैदानांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सीबीडी सेक्टर १ परिसरातील क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून दिवसाढवळ््या याठिकाणी मद्यपान, जुगार खेळणे असे प्रकार उघडकीस आले आहे. सीबीडी परिसरातील क्रिकेटच्या, फुटबॉल यासारख्या स्पर्धा सेक्टर एक परिसरातील सुनील गावस्कर मैदानात भरविल्या जात होत्या. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या मैदानाची जागा सण आणि उत्सव साजरा करणे, राजकीय पक्षांचे विविध कार्यक्रम, महोत्सवाच्या वापरासाठी दिली जात आहे. या मैदानाचा खेळाडूंना वापर करता येत नसल्याची खंत परिसरातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या मैदानात बाराही महिने विविध स्पर्धा तसेच परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जात होते. मैदानाची दयनीय अवस्था झाल्याने कोणीही या ठिकाणी फिरकत नसल्याची माहिती सीबीडी सेक्टर एक परिसरात राहणाऱ्या दीपक पवार याने दिली. या मैदानाची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने भिकारी, गर्दुल्ल्यांचे आश्रयस्थान झाले आहे. पावसाळ््यापूर्वी दोन महिने याठिकाणी दुष्काळग्रस्तांनी संसार थाटला होता. सण- उत्सव आला की मात्र या मैदानाची साफसफाई करून त्याठिकाणी ती जागा कार्यक्रमाच्या वापरासाठी दिली जाते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मेळावे, महोत्सव यावेळी हे मैदान खेळाडूंना वापरता येत नाही. विद्यार्थ्यांनी खेळायचे तरी कुठे असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर या मैदानाची दुरुस्ती केली जावी, तसेच खेळाडूंना विविध प्रकारचे खेळ खेळण्याकरिता हे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी या मैदानातील दिवे बंद असतात, याचा फायदा घेत याठिकाणी गैरप्रकार घडत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक शंकर जुवळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
सीबीडीतील सुनील गावस्कर मैदानात मद्यपान
By admin | Published: August 04, 2016 2:11 AM