लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड: एखाद्या वेळेस आपण घाई-घाई असताना आपली बॅग, वॉलेट अथवा एखादी मौल्यवान वस्तू विसरतो. त्यानंतर आपल्याला ती विसरलेली वस्तू मिळााली नाही, तर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. परंतू तीच विसरलेली वस्तू आपल्याला परत मिळाल्यावर आपल्याला आनंद आणि समाधान मिळते. अशीच घटना अलिबाग एसटी आगारात घडली. प्रवाशाचे विसरलेले तब्बल 35 हजार रुपये चालक आणि वाहकाने परत करुन प्रामाणिकपणा आजही असल्याचे दाखवून दिले.
15 जून 2021 रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता अलिबागहून जाणाऱ्या रेवदंडा-बोरिवली गाडी क्र.3234 मधील एक प्रवासी त्याची बॅग विसरला बसमध्येच विसरला होता. वाहक जितेंद्र पवार यांना प्रवाशाची बॅग राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत चालक निलेश पाटील यांना सांगितले. त्यानंतर वरिष्ठांना हा प्रकार सांगितला.प्रवाशाच्या विसरलेल्या बॅगेमध्ये रोख 35 हजार रुपये असल्याचे आढळले. त्यानंतर ओळख पटवून सदरची बॅग आणि रोख 35 हजार रुपये प्रवाशाला परत केले.
बॅग परत मिळाल्याने प्रवाशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान तर होतेच शिवाय वाहक पवार आणि चालक पाटील यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती. प्रवाशाने दोघांचेही आभार मानले. आजच्या जगात असा प्रामाणिकपणा क्वचितच दिसून येत असल्याचे प्रवाशांने सांगितले. पवार आणि पाटील यांच्या या प्रामाणिकपणामुळे अलिबाग आगाराची तसेच एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल झाली. या दोन्ही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या हस्ते आज अलिबाग आगारात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.