शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. यावर मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ड्रायव्हरला डुलकी लागली असावी, त्यातून अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे.
राजकीय नेत्यांना अनेकदा रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचे असल्याने ते टाळता येत नाही. विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. रात्रीची वेळ होती, रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला डुलकी लागली असावी, त्यातून अपघात झाला असावा, अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसांपूर्वीच मेटे मला भेटले होते. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षण यावर आमची बराच वेळ चर्चा झाली. मराठा समाजाचेच नाही तर राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.
चालकाने काय सांगितले... मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.