ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 18 - खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर येथे नारंगीनदीच्या पुराचे पाणी भरल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. लहान वाहने पर्यायी मार्गाने जात होती तर मोठी वाहने रस्त्यात रांगेत उभी होती मात्र दापोलीहून खेडकडे येणाऱ्या एका एस. टी. चालकाने अतिउत्साह दाखवत रस्त्यावरून पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत असताना त्या पुराच्या पाण्यात एस.ती.बस घातली आणि मधोमध जाताच एस. टी. बस बंद पडली. सुदैवाने त्या बसमध्ये काही मोजकेच प्रवासी होते. ते छातीइतक्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडले. पुराच्या पाण्यात मधोमध बंद पडलेली बस तेथे जमलेल्या काही धाडसी तरुणांनी धक्के मारून बाहेर काढली.
खेड शहरात पूरस्थिती
शहरात मंगळवारी दिवसभर पूरपरिस्थिती कायम राहिली. मंगळवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी व नारिंगी नद्यांना पूर आला. या दोन्ही नद्यांनी आपली पातळी ओलांडली. जगबुडी नदीने ७ मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड पालिकेने व शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व्यापारी व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.
पुराचे पाणी मंगळवारी पहाटेपासून बाजारपेठेत घुसण्यास सुरुवात झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला शहरातील मटण मार्केट व मासळी मार्केट पुराच्या पाण्यात गेले. सुक्या मासळीची ५० दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. या इमारतींमधील इतर साहित्य पाण्यावर तरंगत आहे.
जगबडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील गांधी चौकातील व्यापारी धास्तावले आहेत. नदीकिनारी वसलेला तांबे मोहल्ला, महाडिक मोहल्ला व साठे मोहल्ल्यामध्ये पुराचे पाणी भरण्याची शक्यता असल्याने खेड पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी शहरात रिक्षाद्वारे सावधानतेचे आवाहन केले आहे.