मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाचे रुग्णवाहिका वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था आणि पालघरच्या राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेने बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात या संस्थांच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या संबंधीची निविदा २० जुलै २०२१ रोजी काढण्यात आली होती. पूर्ण राज्यात वाहनचालक पुरविण्यासाठी १८ संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. संबंधित संस्थांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार रूपेशकुमार अहिरे यांनी आरोग्य भवन; मुंबई यांच्याकडे केली होती पण या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर अहिरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार आता दोन्ही संस्थांविरुद्ध १ जून रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध संस्थांना चालक पुरविल्याचे दाखले- यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था, नाशिक आणि राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्था, पालघर यांनी वाहनचालक पुरविल्याची बनावट कागदपत्रे सादर केली. - तसेच, वार्षिक उलाढाल किती रुपयांची आहे यासंबंधीची प्रमाणपत्रेही बनावट सादर केली. या शिवाय, कामगार आयुक्त यांच्याकडील ईएसआयसीचे बनावट प्रमाणपत्र, बनावट चलन, जीएसटीची खोटी प्रमाणपत्रे जोडून आरोग्य विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी आता भादंविच्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ४२०, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
संस्थांचाही इन्कारयशोधरा संस्थेने हंसा सिटी बस सर्व्हिसेस नागपूर, नोबल ड्रग्ज लि. सातपूर (नाशिक), महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ, सुमंगल मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग कंपनी; मालेगाव, सेंट डोमेस्टिक आश्रम नागपूर, या संस्थांना वाहनचालक पुरविल्याची प्रमाणपत्रे सादर केली. या पाचही संस्थांनी अशी प्रमाणपत्रे दिलेली नाहीत, असे लेखी दिले.
अटकपूर्वसाठी धावाधावयशोधरा संस्थेच्या अध्यक्ष संगीता दशपुते आणि राजर्षी शाहू संस्थेचे अध्यक्ष जनार्दन चांदणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आपण चौकशीला सहकार्य करू, तक्रारकर्त्याने जाणूनबुजून दोनच संस्थांना लक्ष्य केले आहे, असे चांदणे यांनी सांगितले.