मुंबई : मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अली दर्ग्याभोवती शनिवारी रात्री घिरट्या घालत असलेल्या ड्रोनमुळे खळबळ उडाली. नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होऊन चर्चा सुरू झाली. मात्र ड्रोन सुरक्षेकरिता उडविण्यात येत असून, त्याला मुंबई पोलिसांनी परवानगी दिल्याचे समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हाजी अली दर्ग्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच येथे आहे. शनिवारी रात्री उशिराने हाजी अली दर्ग्यावर कव्वालीचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक नागरिकांना दर्ग्याभोवती ड्रोन उडत असलेले दिसून आले. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होणार तोच दर्ग्याचे विश्वस्त यांनी मध्यस्थी करून सुरक्षेच्या कारणामुळे ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबई पोलिसांनीही याला दुजोरा दिल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दर्ग्याचे विश्वस्त ताडदेव पोलिसांकडे ड्रोनच्या परवानगीसाठी गेले असता, त्यांनी परवानगी दिल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश देवडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
हाजी अलीजवळ ड्रोनमुळे खळबळ
By admin | Published: February 22, 2016 12:56 AM