पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा सलग चार दशके वारी करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या शेतकऱ्याचे नाव विठ्ठल मारुती चव्हाण असून ते 61 वर्षांचे आहेत. त्यांचे मूळ गाव सांगवी, सुनेगाव तांडा आहे. विठ्ठल चव्हाण हे दहा वर्षे उपसरपंच होते. तसेच सध्या तंटामुक्त समितीचे सदस्य आहेत. चव्हाण हे 1980 पासून पंढरपूरची वारी करत आहेत.
विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले की, गावाकडे पाच एकर शेती आहे. बागायत शेती होती. मात्र, दुष्काळामुळे कोणतीही पिके पिकत नाहीत. महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा, भरपूर पाऊस पडावा, हीच मागणी विठ्ठल चरणी करणार आहे. नापिकीमुळे दोन्ही मुले चालक म्हणून नोकरी करतात.
हा मान कसा मिळतो?
पंढरपूरला लाखो वारकरी आलेले असतात. यापैकी एका दांम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा करण्याचा मान मिळतो. पण एवढ्या लाखो वैष्णवांमधून या दांपत्याची निवड कशी केली जाते? विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हे वारकरी तासंतास रांग लावतात. या रांगेमध्ये पहिला उभा असलेल्या दांम्पत्याला महापुजेचा मान दिला जातो. जर विठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर वारकरी निराश होत नाहीत. तर ते शेजारच्या कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि तृप्त होतात.