ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 2- जिल्ह्यातील दुष्काळी भागाची गुरुवारी केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. गुरुवारी केंद्रीय पथकाने अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस आदी भागातील दुष्काळी भागाची पाहणी केली़. यावेळी बंद पडलेले पाणीपुरवठा स्रोत, जळालेल्या बागा, कोरडा पडलेला धुबधुबी प्रकल्प, पडीक पडलेल्या जमिनी पाहताच दुष्काळी दाहकतेची खात्री या पथकाला पटली. यामध्ये पाच जणांचा समावेश होता.यामध्ये राणी कुमोदिनी, आर. के. सिंग, एच. आर. खन्ना, पी. के. मिश्रा, जी. आर. झरगर, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांचा समावेश होता. या पथकाने खालावलेली पाण्याची पातळी, टँकरचा आढावा, जलयुक्त शिवारातून झालेली कामे यासह गावाच्या चारही शिवारातील दुष्काळाची पाहणी त्यांनी केली. पथकाला माजी आ. महादेवराव पाटील, माजी उपसभापती मल्लिकार्जुन पाटील, सरपंच डॉ. विठ्ठल राठोड व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, राजशेखर मसुती, आनंद खजुरगीकर यांनी मदतीसाठी निवेदन दिले. इंगळगीमार्गे शिरवळ परत जेऊर या पाहणी दौऱ्यात त्यांना सगळीकडे उजाड माळरानच दिसले. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती व पायपीटही या पथकाने पाहिली. चंद्रकांत पाटील यांच्या जळालेल्या द्राक्ष व इतर बागांची पाहणी करून श्रीमंत झंपा यांच्या मुळासकट जळालेल्या पेरुची बागही त्यांनी पाहिली.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील निरीक्षणावरून काहीच सांगू शकत नाही. याचा एकत्रित अहवाल सादर करणार असून, मदतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत.- राणी कुमोदिनी, प्रमुख, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकतालुक्यात कंपार्टमेंट बंडिंग व जलयुक्त शिवाराच्या कामावर भर द्या. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. नुकसानीचा अंदाज घेतला. शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे, याची कल्पना आली आहे.- आर. के. सिंग, सदस्य, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथक