पुणे/मुंबई : राज्यात गेल्या साडेतीन महिन्यांत सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस झाला असून निम्मा सप्टेंबर महिना कोरडा गेल्याने खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असून मराठवाड्यातील धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ २८ टक्के, तर नागपूर विभागात ४९ टक्केच साठा आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास २०१५ नंतर राज्यावर पुन्हा दुष्काळाचे ढग घोंघावण्याची भीती आहे.राज्यातील सात जिल्ह्यांत सरासरी पर्जन्यमानात तब्बल २५ ते पन्नास टक्के घट नोंदविण्यात आली आहे. विविध जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. त्यातही औरंगाबाद, सोलापूर, बीड आणि नागपूरच्या काही भागांत दुष्काळी स्थितीची तीव्रता तुलनेने अधिक असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.राज्यात ७ सप्टेंबरअखेरीस सरासरी ९७६.४ मिलिमीटर पाऊस पडतो. या कालावधीत ८२८.४ मिलिमीटर (८४.८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतरच्या दहा दिवसांत राज्यात पावसाने पाठ फिरविली आहे. सोलापूरमध्ये सरासरीच्या अवघा २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. पाठोपाठ नाशिक, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबादला सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या ७५ ते शंभर टक्केदरम्यान पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १४ तालुक्यांमध्ये २५ ते पन्नास टक्के, १०६ तालुक्यात ५० ते ७५, १२६ तालुक्यात ७५ ते १०० आणि १०९ तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील बारामती, शिक्रापूर, पुरंदरच्या परिसरात पावसाने बरीच ओढ दिली आहे. परिणामी येथील पिके संकटात आली आहेत. म्हणजेच पावसाची सरासरी गाठलेल्या जिल्ह्यांतीलच काही तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात चांगला पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातील काही भागातील स्थिती पिकांसाठी तितकीशी चांगली नाही. पर्जन्यमानात ५० टक्क्यांपर्यंत घट असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना रब्बी हंगामावरच भिस्त ठेवावी लागणार आहे.आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाडा व विदर्भात सोयाबीन व कापूस पीक करपू लागले आहे. त्यातूनही तग धरून उभ्या असलेल्या सोयाबीनमध्ये पाण्याअभावी दाणे भरण्यास अडचण येणार आहे. उडीद, मुगाच्या उत्पादनात २५ ते ३० घट होण्याची शक्यता आहे. खान्देशातही पावसाचे प्रमाण कमी आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यात पिकांवर ताण पडला आहे. कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाला असताना पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची भीती आहे. माण खटाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा या भागांत पावसाने मोठी ओढ दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने ओढ दिल्याने भात, मूग, उडीद आणि जिरायती कापसाच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता असून, औरंगाबादमध्ये मूग आणि मका पिकाला फटका बसेल. बीड, कोल्हापूर आणि सांगली भागातील पर्जन्यमान कमी असलेल्या भागात पिकांच्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत बाजरी, सूर्यफूल आणि भुईमूगाच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरल्याने पाऊस कमी पडूनही सोलापूर जिल्ह्याला तितकीशी झळ बसणार नाही.
सात जिल्ह्यांत स्थिती चिंताजनकराज्यातील सात जिल्ह्यांत सरासरी पर्जन्यमानात तब्बल २५ ते ५० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. त्यातही औरंगाबाद, सोलापूर, बीड आणि नागपूरच्या काही भागांत टंचाईची तीव्रता तुलनेने अधिक असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.
मराठवाड्यात अल्प पाणीसाठाधरणांमधील पाणीसाठ्यात मराठवाड्यात सर्वाधिक चिंतेची स्थिती आहे. विभागात केवळ २८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी १६ सप्टेंबरला ५६ टक्के पाणीसाठा झाला होता. जायकवाडी धरण ४५ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या मध्यास त्यात ८६ टक्के पाणीसाठा झाला होता.
विदर्भात निम्माच पाणीसाठाविदर्भात नागपूर विभागात ४९ टक्के, तर अमरावती विभागात ५७ टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे. बुलडाण्यात तीन धरणांत २० टक्क्यांपेक्षा कमी, वर्ध्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी, तर भंडाºयात ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती नाही. वैजापूर, गंगापूरसारख्या भागात व सोलापूर, बीड जिल्ह्यातील काही परिसरात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. पुढील काळात पाऊस झाला तर रब्बी हंगामात तेथे पेरण्या होतील.- विजयकुमार इंगळे, कृषी संचालक