विजय गायकवाड,अकोले- दुष्काळात अकोले गावाची पाण्याची तहान मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे. इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या अवर्षण क्षेत्रात येणाऱ्या अकोले गावाची ओळख दुष्काळग्रस्त म्हणूनच केली जाते. मात्र, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पाण्याची खालावलेली पातळी वाढवण्यासाठी दलित वस्ती येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. त्यात खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या मागणीनुसार पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचे आज ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. चौदा लाख रुपये खर्च करून वीस मीटर रुंद आणि तीनशे मीटर लांबीच्या बांधलेल्या या बंधाऱ्यात आठ सहस्र दशलक्ष घनमीटर पाणी साठले आहे. यामुळे गावातील लोकांसाठी असणाऱ्या बोअरवेल, विहिरी, हातपंप यातील पाण्याची पातळी वाढून ऐन दुष्काळात पाण्याची समस्या मिटण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार होणार आहे. दरवर्षी खडकवासला कालव्याचे येणारे आवर्तन वितरिकांद्वारे गावाला देण्यात येत असायचे. मात्र वितरिकांचे पाणी संपून गेल्यावर गावातील लोकांना पाण्याची टंचाई लगेच निर्माण होत असे. मात्र, कृषी विभाग, अकोले ग्रामपंचायत आणि पाटबंधारे खाते यांच्या सहकार्याने आज या सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडून बंधरा तुडुंब भरला आहे. त्या पाण्याचे महिलांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, या बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे गावाच्या आजूबाजूच्या भूजल पातळीत वाढ होऊन हातपंप आणि विहिरींना पाण्याची वाढ होणार आहे. याप्रसंगी सरपंच सुनीता वणवे, उपसरपंच वसंतराव शिंदे, पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.डी. ढोले, पी.डी. शिंदे, आर.एल. भोंग , कर्मचारी बाबा कांबळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यामुळे गावातील लोकांना पाण्यासाठी महत्त्वाचे स्रोत असणारे आरोग्य केंद्राजवळ आणि अंकलेश्वर मंदिर येथील हातपंपांची पाण्याची पातळी वाढणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज भागणार आहे. या सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांची पाण्याची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे.
दुष्काळग्रस्त अकोले आता झाले पाणीदार!
By admin | Published: March 01, 2017 12:50 AM