मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. तर निवडणूकीत विविध मुद्यांवरून सत्ताधारी पक्ष व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना पाहायला मिळत आहे. मात्र याच निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वच मतदारसंघात भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर मतदारसंघात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून, गावभेटी आणि प्रचार सुद्धा सुरु झाला आहे. मात्र अशात राज्यातील दुष्काळाग्रस्त भागातील प्रश्नांकडे लक्ष देतांना कुणीच दिसत नाही. महत्वाच्या नेत्यांची एकमेकांवर आरोप होत आहे. मात्र हेच नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही.
मध्य महाराष्ट्रात धो धो बरसलेल्या मान्सूनची वक्रदृष्टी मराठवाड्यावर कायम राहिली असून, सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़. राज्यातील सरासरीच्या ३३ टक्के जादा पावसाची नोंद झाली असली, तरी १० जिल्ह्यात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड वगळता अन्य सर्व ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. बीडमध्ये २७ टक्के, लातूरमध्ये २१ टक्के, हिंगोलीत १७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थिती मदतीची अपेक्षा असलेल्या दुष्काळग्रस्तांकडे पाहण्यासाठी राजकीय नेत्यांना वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक भागात हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे आमच्या सारखे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सत्तधारी किंवा विरोधक सर्वच राजकीय नेते निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसत असून, आमच्या मदतीला कुणीच येत नाही. योगेश मोरे ( शेतकरी जालना )