पुणे : यंदा महाराष्ट्रासह देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक या भागात यंदा पाऊस कमी होईल आणि तेथे दुष्काळी स्थिती निर्माण होईल, असे भाकित ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आज वर्तविले.टेरी पॉलिसी सेंटर या संस्थेने ‘या वर्षीच्या मॉन्सूनचा अचूक अंदाज’ या विषयावर पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या इंद्रधनुष्य या इमारतीमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.साबळे म्हणाले, की यंदा मॉन्सूनचा पाऊस कमी पडणार असून, प्रामुख्याने मध्य भारतात त्याचे प्रमाण कमी असणार आहे. यंदा जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचा फटका महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांना बसणार आहे. त्यामुळे त्याची गंभीरता लक्षात घेत प्रत्येक राज्याने त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.देशावरील हवेच्या दाबावरून मॉन्सूनचा मार्ग ठरत असतो. यंदा पूर्ण देशात मॉन्सूनला योग्यपद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी अनुकूल हवेचे दाब दिसून येत आहेत. त्यामुळे यंदा मॉन्सून नियोजित वेळेअगोदर देशभरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आत्ताची स्थिती अशी असली, तरी मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती वाढली, तर त्याचा विपरीत परिणाम मॉन्सूनवर होईल आणि देशातला पाऊस आणखी कमी होईल. यंदा पूर्ण मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहणार आहे. याचाच अर्थ यंदा जून, जुलै आणि आॅगस्ट या महिन्यांमध्ये पावसाचे खंड पडणार आहेत, हे स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.कमी दिवसांत जास्त पाऊस होण्याचा प्रकार यंदा मोठ्याप्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे, असे सांगत साबळे म्हणाले, की राज्यातील दुष्काळी स्थिती दर वर्षी वाढत असल्याचे दिसून येत आहे. १९७४ मध्ये राज्यात ८४ तालुके आणि १२ जिल्हे दुष्काळग्रस्त होते. तर, २०१२ मध्ये यात वाढ होऊन १२३ तालुके आणि १९ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३९ तालुक्यांची यात भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून राज्यात कमी पावसाचा पट्टा विस्तारत आहे. हवामान बदल हे यामागचे प्रमुख कारण आहे. (प्रतिनिधी)‘एल निनो’च्या प्रभावात वाढ४प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ झाली की तेथे हवेचा कमी दाब निर्माण होतो. हा दाब भारतात येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे खेचतो. त्यामुळे मॉन्सूनचे बाष्पयुक्त ढग प्रशांत महासागराकडे जातात आणि भारतात पाऊस पडत नाही. या स्थितीला ‘एल निनो’ म्हणतात. सध्या प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून ‘एल निनो’च्या प्रभावात वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.गेले वर्षभर पाऊस४हवामान बदलाच्या झळा राज्याला बसत आहेत. १९७४ मध्ये राज्यात ८४ तालुके दुष्काळग्रस्त होते. ४तर २०१२ मध्ये यात वाढ होऊन १२३ तालुके दुष्काळग्रस्त झाले. गेले वर्षभर तर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांचे नियोजन हवे४पाऊस कमी पडणार असल्याने त्यानुसार पिकाचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे, असे सांगत रामचंद्र साबळे म्हणाले, की राज्यात कापसाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र,त्याला खूप पाणी लागते. यंदा पाऊस कमी पडणार असल्याने कापसाऐवजी तूर, सोयाबिन, मिरची, मका, सूर्यफूल ही कमी पाण्यावर लवकर येणारी आणि शाश्वत उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर ६५ दिवसांत येणारे घेवडा पीक घेऊन त्यानंतर लगेचच रब्बीच्या ज्वारीचे पीकही शेतकऱ्यांना घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी मॉन्सून आल्यानंतर ६५ मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणीच करू नये.