ऑनलाइन लोकमतकारंजा लाड, दि. 11- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रुपांतरीत करणे शक्य आहे. ही योजना निराशेला आशेत बदलण्याचा कार्यक्रम असून राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान प्रशंसनीय आहे.या योजनेमध्ये भ्रष्टाचार न होण्यासाठी ही कामे काँट्रॅकटरला न देता लोकसहभागातून झाली पाहिजे असे मत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी तालुक्यातील भामदेवी व शहरातील सारंग तलावाच्या जल संधारणांच्या कामांचे अवलोकन व जलपूजन कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कारंजा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी शरद जावडे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, कृषी अधिकारी समाधान धुळधुले , परिविक्षाधीन तहसीलदार रमेश जेंशवंत , डॉ.निलेश हेडा आदींची उपस्थित होते. राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदुषण, भूजलाचा पुनर्भरणापेक्षा अधिक प्रमाणात वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद या आजच्या प्रमुख समस्या आहेत.
या समस्यांच्या निराकरणासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. जलक्रांती घडविण्याची क्षमता प्रत्येकात आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या क्षमतेचा जाणिवेने वापर करून गावातील पाणी समस्या दूर करावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक सरपंच, पोलीस पाटील आदींसह नागरिकांची बहुसंख्येमध्ये उपस्थिती होती. कार्यक्रमाचा संचालन मंडळ अधिकारी देवानंद कटके यांनी केले. तर आभार तलाठी देवेंद्र मुकुंद यांनी मानले.