मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असताना भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिलेली नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रपरिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात मदतीची केवळ घोषणा केली होती, पण केंद्र सरकारकडे मदतीचा सुधारित प्रस्तावदेखील राज्याने अद्याप पाठविलेला नाही. केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्याने मदत दिली असेही झालेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. दुसरीकडे महसूल मंत्री एकनाथ खडसे, खा.संजय धोत्रे हे भाजपाचे नेते शेतकऱ्यांची थट्टा करणारी विधाने करीत आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी केला. काँग्रेस नेत्यांची समिती येत्या काही दिवसांत विदर्भ, मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)औरंगाबादची जबाबदारीअशोक चव्हाण यांच्याकडेऔरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राहील. नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोपविण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तर ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व हर्षवर्धन पाटील यांच्यावर राहिल, असे ठाकरे यांनी सांगितले.५ ला औरंगाबाद तर १२ ला अमरावतीत बैठकमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्यासाठी ५ जानेवारीला औरंगाबाद येथे काँग्रेसची बैठक होणार आहे. विदर्भातील परिस्थितीबाबत अमरावती येथे १२ जानेवारीला बैठक होणार आहे.काँग्रेसची प्रेरणायात्रा ९ लाराष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात स्वातंत्र्य लढ्यासाठी ९ जानेवारी १९१५ मध्ये परतले होते. त्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने ९ जानेवारीला गेट वे आॅफ इंडियापासून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत प्रेरणा यात्रा काढण्यात येणार आहे.