पारोळा (जि.जळगाव) : भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील पाणी टंचाईची स्थिती पाहता मराठवाड्याच्या धर्तीवर सिमेंटच्या टाक्या उभारून पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली.
जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर आणि चाळीसगाव तालुक्यात त्यांनी दुष्काळीस्थितीची पाहणी केली. पारोळा तालुक्यातील मोहाडी येथे त्यांनी दुष्काळी स्थितीत तहसीलदारांकडे टँकर मंजुरीचे अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय कोणी सक्तीची वसुली करीत असेल, तर त्यांच्या नावासह पत्रव्यवहार करा. मी लगेच कार्यवाही करीन. शासन दुष्काळात तुमच्या पाठीशी आहे. जी जी मदत करता येईल ती करू असे, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.मराठवाड्यासारखा पॅटर्न राबविणारजिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात सिमेंटच्या टाक्या बांधून देण्यात आल्या आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी टाकले जाते. त्या ठिकाणावरून नागरिक पाणी घेऊन जातात. असाच पॅटर्न जळगाव जिल्ह्यात राबविला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.