पुणे : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागात पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागातदेखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमध्ये अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.मान्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही. राज्याच्या दुसऱ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांतच मान्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वांत मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली.
पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा मात्र अद्याप कोरडाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:38 AM