नागपूर : दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा विधानसभेत बुधवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांनी सांगितले की, ग्रामस्तरावर सरपंच या समितीचे अध्यक्ष राहतील, तर तालुकास्तरावर पालकमंत्री किंवा शासनातर्फे नियुक्त अशासकीय सदस्याला अध्यक्षपद देण्यात येईल. त्याचप्रकारे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षतेसाठी पालकमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यापैकी कुणाही एकाला अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगण्यात येईल. याशिवाय समितीमध्ये इतर लोकांनाही सहभागी केले जाईल. खडसे यांनी सांगितले की, ही समिती दुष्काळग्रस्त भागांमध्ये शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मदतकार्य किंवा योजनांची उदाहरणार्थ पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, चारा छावणी, जनावरांच्या देखभालीसह इतर विविध प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवण्याचे कार्य करेल आणि सुधार करण्याच्या सूचनाही देईल. या समित्या स्थापन करण्याचा उद्देश दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुरू असलेली कामे प्रभावीपणे अमलात यावीत, असा आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळ मदतकार्यांवर समित्या लक्ष ठेवणार
By admin | Published: December 23, 2015 11:30 PM