विदर्भात गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत चाललाय. पाच वर्षांत पोलिसांनी तब्बल साडेचारशेच्यावर अमली पदार्थविरोधी कारवाया केल्या आहेत, यावरून त्याची खात्री पटावी. विदर्भच नव्हे, तर मध्य भारतातील ड्रग सप्लायर आणि पेडलर्सचे नागपूर हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अलीकडेच ‘थर्टी फर्स्ट’ पार्टीच्या नावाखाली अमली पदार्थाचा सप्लाय झाल्याचे दिसून आले...‘उडता पंजाब’च्या धर्तीवर ‘उडता विदर्भ’च्या दिशेने ही वाटचाल तर नव्हे?
नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन -पाच वर्षांत एकट्या नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीचशेवर कारवाया केल्या. नागपुरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजाची, तर मुंबईतून हेरॉईनची खेप येते. १० वर्षांपूर्वी नागपूर पोलिसांनी अडीच कोटींचा ट्रकभर गांजा जप्त केला होता. खासगी वाहने, रेल्वे आणि खासगी बसने गांजा, हेरॉईनची तस्करी होते. २०१८ पासून नागपुरात एमडी तस्करांनी नेटवर्क सुरू केले. आबू खान नामक तस्कराने पोलिसांना हाताशी धरून नागपूर व आजूबाजूच्या राज्यांतही एमडीची तस्करी सुरू केली. गेल्यावर्षी पोलिसांनी आबूचे साम्राज्य उद्ध्वस्त करून त्याला कोठडीत डांबले. लाखोंचा माल जप्त केला. चंद्रपुरात गांजासह गर्दा पावडर, डुडा भुकटीची धूम -दारूबंदीनंतर ड्रग्सला समांतर अशा गर्दा पावडर, डुडा भुकटी, गांजा यासारख्या अमली पदार्थाने चंद्रपूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. शाळकरी मुलांनाही या नशेने जाळ्यात ओढले आहे. चंद्रपुरातील भिवापूर, अष्टभूजा वार्ड, बंगाली कॅम्प परिसरात याचे अड्डेच तयार झाले आहेत. नशेच्या आहारी गेलेली मुले सायंकाळ होताच पालकांना मित्राचे नाव सांगून या अड्ड्यांवर जाऊन सामूहिकपणे नशा करतात. रात्री १० नंतरच ते परत घरी येत असल्याचे काही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा, मध्य प्रदेशातून वर्ध्यात येतो गांजातेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेशासह इतर नक्षलबहुल डोंगराळ भागातून रेल्वे, एसटी तसेच स्पेअरपार्ट्स वाहतुकीच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यात गांजा येतो. पाच वर्षांत ५० कारवाया झाल्या. शहरात सुमारे शंभरावर गांजाविक्रेते आहेत. इतवारा परिसरात असे एकही घर नाही जेथे गांजा विक्री होत नाही. ३० रुपयांच्या पाकिटासह २०० रुपयांपर्यंतच्या पाकिटात गांजा मिळतो. बकरी पाळणारे खेडेगावात गांजा पोहाच करून देत असल्याची माहिती आहे. असे असूनही उभ्या जिल्ह्यात एकही शासकीय तसेच खासगी व्यसनमुक्ती केंद्र नाही.नायजेरियन तरुणाला अटकअकाेला जिल्ह्यात पाच वर्षांत ४९ कारवायांमध्ये काेकेन, गांजासह एक काेटी ४३ लाखांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. १०३ आराेपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये जेम्स नामक नायजेरियन तरुणाचाही समाेवश आहे. आरोपींमध्ये चार महिला असून एका महिलेवर स्थानबद्धतेची कारवाई झाली आहे.
अमरावती - जिल्ह्यात पाच वर्षांत ८२ कारवायांमध्ये १ कोटी ५५ लाख ५० हजार २१९ रुपयांचा गांजा जप्त व १२७ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंध्र प्रदेश व तेलगंणा राज्यातून गांजा जिल्ह्यात येतो. गोंदिया -गोंदियात गांजा, ब्राऊन शुगर, इंजेक्शन व गोळ्यांचेही सेवन करून नशा केली जाते. शहरात एकच व्यसनमुक्ती केंद्र असून वर्षाकाठी ३०० जणांवर या ठिकाणी उपचार केला जातो.भंडारा - मध्य प्रदेशातून आयात गांजाची जिल्ह्यात ठिकठिकाणी विक्री केली जाते. जिल्ह्यात गांजा ओढणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. गडचिरोली -दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गांजाचा कच्चा माल तेलंगणातून सीमावर्ती भागात आणला जातो. सिरोंचा तालुक्यातून त्याची पुढे विल्हेवाट लावली जाते. कारवायांचे प्रमाण फारच कमी आहे. यवतमाळ - जिल्ह्यात तेलंगणा व मध्य प्रदेशातून गांजा येतो. एकट्या शहरात दिवसाला पाच ते सात किलो गांजा विकला जातो. ५० रुपयाच्या पुडीत चौघांची नशा होते. कुरिअर, एसटी बस, भाजीपाल्याची वाहने ही गांजा वाहतुकीची सर्वाधिक सुरक्षित साधने मानली जातात. तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी विविध महाविद्यालयांत समुपदेशन वर्ग घेतले जात आहेत. गेल्यावर्षी ४३ महाविद्यालयांत मार्गदर्शन केले असून, तरुणाईला या व्यसनाचे धोके समजावून सांगण्यात आले. - सार्थक नेहते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एनडीपीएस, नागपूर.अशी असते गर्दा पावडरची नशा -२०० रुपयाला गर्दा पावडरची चिमूटभर पुडी मिळते. प्लास्टिकच्या पन्नीवर सुईच्या टोकाएवढी पावडर टाकून पन्नीला आग लावून त्यातून निघणारा धूर नाकाद्वारे घेऊन ही नशा केली जाते. ही नशा तब्बल दोन दिवस उतरत नाही. २० ते ३० वर्षांच्या वयातील १५ टक्के रुग्ण हे गांजा व गर्दा पावडर, डुडा भुकटीने ॲडिक्ट झालेले असतात. या नशा करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून दारूसारखा वास येत नाही. झिंगत नाही. म्हणून ही नशा करणारी व्यक्ती लक्षात येत नाही. थेट मेंदूवर आघात करणारी ही नशा आहे. - डाॅ. किरण देशपांडे, मानसिक रोगतज्ज्ञ, चंद्रपूर.(संकलन : राजेश भोजेकर, नरेश डोंगरे, संदीप मानकर, सचिन राऊत, अभिनय खोपडे, अंकुश गुंडावार, ज्ञानेश्वर मुंदे, मनोज ताजने)