मुंबई : बीड जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या मुद्दाकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले.
नियम 93 अन्वये हा मुद्दा उपस्थित करताना मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हा रूग्ग्णालय, तालुका राज्यातील सर्व रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रथमोपचार औषधापासुन ते अपघाती व विषबाधा झालेले रूग्ण, बालके यांच्यासाठीही औषधे मिळत नसल्याचे ते म्हणाले.
औरंगाबादच्या घाटी रूग्णालयातील औषधांची टंचाई, राज्यातील सर्वच रूग्णालयातील परिस्थितीही त्यांनी यावेळी बोलताना विषद केली. श्वानदंश, सर्पदंश औषधांच्या टंचाईकडेही त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी राज्यात सर्वत्र औषधांचा पुरेसा साठा असुन श्री.मुंडे यांनी सांगितलेल्या सर्व तक्रारींची पुन्हा एकदा खात्री करून घेतली जाईल, घाटी रूग्णालयातील औषध पुरवठा व्यवस्थित राहील याकडे स्वत: लक्ष देऊ, असे आश्वासन दिले. श्वानदंश, सर्पदंश झाल्यानंतर लागणारी औषधे उपलब्ध असुन त्याचा कोणी कृत्रिम तुटवडा करीत असले, तर त्या अधिकाऱ्याला त्या क्षणी निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला.