ऑनलाइन लोकमत
कुरकुंभ(पुणे), दि. 24 - अवघ्या देशाला ज्याने विळखा घातलेला आहे अशा अमली पदार्थांची मोठी ड्रग फॅक्टरी पुण्यामध्येच कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच व अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याची किंमत तब्बल १०० कोटी होईल इतका अंमली पदार्थांचा साठा आज जप्त केला. दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील सुजलाम केमिकल्स या कंपनी मध्ये छापा मारून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईअंतर्गत मेफिड्रीन हा अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कंपनीचे मालक हरिश्चंद्र दोरगे याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. बिहारमध्ये असताना सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी अँटी नार्कोटीक सेलच्या उपायुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील सुजलाम या रासायनिक कंपनीमध्ये अवैध रित्या अमलीपदार्थ बनवण्याचा प्रकार अत्यंत छुप्या पद्धतीने सुरू होता. त्याची येणा-या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करीही केली जाणार होती. मात्र हा डाव डाव अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी केलेल्या या कारवाईने हाणून पाडला आहे. या कारवाई मध्ये एक कोटी साठ लाख रुपयाचे मेफिड्रन सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र याचीच किंमत वाढून १०० कोटींच्या आसपास जाते अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुजलाम ही कंपनी छुप्या पद्धतीने राजरोसपणे हा सर्व अवैध कारभार करीत असल्याची माहिती मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मुंबईतील मानखुर्दमध्ये डोरजी नावाच्या एका व्यक्तीला पकडल्यानंतर यासंबंधी सुगावा लागला होता. त्यानंतर शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वात पुण्यात छापेमारी करण्यात आली. हा सर्व माल पुण्यातील फॅक्टरीत तयार करून त्यानंतर छुप्या पद्धतीने बाजार पेठेत विकला जात असल्याचीही माहिती पुढे येत आहे. पुण्यामध्ये अशी ड्रग फॅक्टरी इतक्या मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने ही नवीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयडीसीमध्ये केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती आहे. हे ड्रग्ज तरुणांपर्यंत पोहोचवलं जात होते, या कंपनीचे मालक हरिश्चंद्र दोरगे याला मुंबईत अटक करण्यात आली. कुरकुंभ येथील कंपनीत गुन्हे अन्वेषण पथक व अमलीपदार्थ विरोधी पथकाने दुपारी २ वाजल्यापासून ही कारवाई सुरू केली. पोलीस निरीक्षक भालेकर, वाढवणे यांचे पथकही सहभागी झालेले होते. दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी देखील या कारवाईत सहभाग घेतला. तपास अधिकारी कुरकुंभ येथे दोन दिवसापासून तळ ठोकून असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
ही कारवाई रात्री रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कंपनीत रसायनाचा मोठा साठा असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सापडलेल्या साठ्यापेक्षाही अधिक साठा या कंपनीत सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या आधी देखील येथून अशाच प्रकारची कारवाई करून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते.