- आविष्कार देसाई, अलिबागमूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या या नफेखोरीच्या साखळीला सुरुंग लावण्याचा पहिला प्रयत्न रायगड जिल्ह्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत आहे. पाच सहकारी संस्थांच्या माध्यमातून जेनेरिक औषधांची विक्री सुरु होणार असून टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यात आरोग्य क्रांतीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे.अलिबागच्या आरसीएफ कन्झ्युमर्स सोसायटीने त्यांच्या मेडिकल स्टोअरमधून ७ सप्टेंबर २०१५ पासून जेनेरिक औषधांच्या विक्रीला सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी असणारी करंजा मच्छीमार संस्था, रायगड बाजार, पीक अॅण्ड पे यासह एक अन्य अशा सहकार तत्त्वावर काम करणाऱ्यांनी त्यांच्या स्टोअरमधून जेनेरिक औषधे विक्रीला हिरवा कंदील दिला असल्याचे सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जिल्ह्यात चार हजार सहकारी संस्था आहेत. त्यातील मोठ्या सहकारी संस्थांना यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकारी संस्थांबरोबर पत्रव्यवहारही केला आहे. त्यांच्याकडून जेनेरिक औषधांची विक्री प्रभावीप्रमाणे व्हावी यासाठी उद्या (बुधवारी) रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यामध्ये याची नुसती सुरुवात झाली तरी तसा संदेश राज्यभर गेल्यास तो सर्वांच्याच फायद्याचा आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी सहकार चळवळ रुजली आहे. तेथेही याचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो. औषध विक्रीचे हे प्रचंड मोठे मार्केट तोडण्यासाठी सहकारी संस्थांना अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. हजारो कोटी रुपयांच्या या मार्केटमध्ये औषध निर्माण कंपन्या, डिस्ट्रीब्युटर, डॉक्टर, रिटेलर अशी मोठी साखळी जोडली गेलेली आहे. त्याचे नुकसान होत असताना ते मोठ्या ताकदीने संघटित होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.नागरिकांचे पैसे वाचणाररायगड जिल्ह्यात औषध विक्रीची उलाढाल सुमारे एक हजार कोटी रुपये आहे. नागरिकांना सर्वसामान्यपणे लागणाऱ्या औषधांच्या किमती या मूळ किमतीच्या सुमारे १०० ते एक हजार २०० टक्के नफा ठेवून विक्री केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची परवड होते. जेनेरिक औषधांमुळे नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत.अडीच कोटी रुपयांच्या औषधांची उलाढालअलिबागच्या आरसीएफ कन्झ्युमर सोसायटीमध्यवर्षाला अडीच कोटी रुपयांच्या औषधांची उलाढाल आहे. तीच जेनेरिक औषधांमुळे सुमारे ५० लाखांवर येऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारचा पैसा वाचणार आहे.
औषध विक्रीच्या व्यवसायाला ‘सहकाराचा सुरुंग’
By admin | Published: October 21, 2015 3:06 AM