वसई : वसई-विरार महापालिकेतील औषध घोटाळा उघडकीस आला असून,त्यात गरोदर स्त्रियांसाठीची ५०० इंजेक्शन्सही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे.पालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी लागणारी औषधे खरेदी केल्यानंतर मुख्य भांडार विभागात त्यांची नोंद होणे बंधनकारक असते. मात्र, नुकत्याच झालेल्या परिक्षणात लेखा परिक्षकांनी वसई येथील डी.एम.पेटीट रुग्णालयातील औषध पुरवठा साठा नोंदवही तपासली असता हा औषध घोटाळा उघडकीस आला आहे.पुरवठा झालेली औषधे, त्यापैकी वापरलेली आणि शिल्लक राहिलेली औषधे यांच्या नगात तफावत आढळून आली.तफावत असलेल्या औषधांचा तपशील आढळून आला नाही. तसेच साठा नोंदवहीत प्राधिकृत अधिकाऱ्याचीही सही नसल्याचे दिसून आले.औषधांप्रमाणे गरोदर स्त्रियांसाठी असलेल्या इंजेक्शनातही तफावत आढळून आली आहे. इंजेक्शनाचे १ हजार ३८२ नग या रुग्णालयाला पुरवण्यात आले होते. त्यापैकी फक्त ८६ नग वापरण्यात आल्यामुळे १ हजार २९६ इंजेक्शन शिल्लक राहणे अपेक्षित होते.मात्र फक्त ७९६ इंजेक्शन शिल्लक राहिल्याचे आढळले.त्यामुळे सुमारे ५०० इंजेक्शनचा घोटाळा अथवा परस्पर विक्री झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.त्याचप्रमाणे वॅक्सीन ए,आर.व्ही या औषधाचे ३५३ नग या रुग्णालयाला पुरवण्यात आले होते.त्यातील २५३ नग वापरण्यात आल्यानंतर एकही नग शिल्लक नसल्याचे आढळून आले त्यामुळे तब्बल १०० नगांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण आता आयुक्त कशा प्रकारे हाताळतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
वसईमध्ये औषध घोटाळा
By admin | Published: April 26, 2016 5:32 AM