लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विदर्भात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात नेर, महागाव, उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतले. अनेक ठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. नेरमध्ये युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा तहसीलवर धडकला. मोर्चातील २१ शेतकऱ्यांविरुद्ध दुधाचा टँकर अडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. नेरमध्येच रस्त्यावर कलिंगड फेकून शेतकऱ्यांनी सरकारविरोधी धोरणाचा निषेध केला.उमरखेड शहरासह हिवरा येथे शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत रोष प्रकट केला. महागाव येथे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध केला. यवतमाळच्या भाजीबाजारात आवक घटल्याने शुक्रवारी सकाळी शुकशुकाट दिसत होता. वर्धा जिल्ह्यात तळेगाव येथे नागपूर- अमरावती मार्गावर शेतकऱ्यांनी भेंडी रस्त्यावर फेकून आंदोलन केले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अमरावती जिल्ह्यात अचलपूर येथे अमरावती - इंदूर महामार्गावर चांदूर बाजार नाका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून निषेध नोंदविण्यात आला. तेलंगण सीमेवर उद्या आंदोलनशेतकरी संघटनेतर्फे महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवरील लक्कडकोट येथे ४ जून रोजी दूध आणि पालेभाज्यांची आवक रोखण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकार आंदोलन दडपण्याची भूमिका घेत आहे. परंतु आता ते शक्य नाही. शेतकरी संघटना विविध शेतकरी समन्वय समितीची सदस्य आहे. यापूर्वी आम्ही दूध-भात आंदोलन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
By admin | Published: June 03, 2017 3:45 AM