औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन शिवसेनेतील नाराजी समोर आली. चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेसच्या मीना शेळके निवडून आल्या तर उपाध्यक्षपदी भाजपाचे एल जी गायकवाड निवडून आले त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांना ३० तर शिवसेना बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांना ३० अशी समसमान मते पडली. त्यानंतर चिठ्ठी उडवून निकाल देण्यात आला त्यात मीना शेळके निवडून आल्या. मात्र उपाध्यक्ष पदाच्या निवडीतही समसमान मते पडणं अपेक्षित होतं. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराला ३२ तर शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मते पडली. त्यामुळे भाजपाचे एल. जी गायकवाड हे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवडून आले. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांची मते शिवसेनेला मिळाली नाहीत. तर शिवसेना नीता राजपूत, अपक्ष श्याम बनसोडे यांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने एल जी गायकवाड निवडून आलेत.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला असून अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असं विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. तर भाजपाला मदत करायची होती तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं असा घणाघात खैरे यांनी सत्तारांवर केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग तीन वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेत घडला होता. शिवसेना व काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता आणली होती. त्यावेळी ठरलेल्या सत्ता समीकरणानुसार अडीच वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा शब्द शिवसेनेने पाळला. मात्र, शिवसेनेच्या विद्यमान जि.प. अध्यक्ष अॅड. देवयाणी डोणगावकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेचेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘मातोश्री’चा आदेश धुडकावत शिवसेनेची नाचक्की केल्याचे चित्र उमटले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही; खोतकरांचा दावा, उद्या घेणार उद्धव ठाकरेंची भेट
आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेस आमदार गोरंट्यालही राजीनाम्याच्या तयारीत
आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा
...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...