ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २९ - उपोषणास बसल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून चिडलेली एक महिला जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढली आणि प्रशासनाची पळता भूई थोडी झाली. या महिलेने टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रशासनही हादरून गेले. पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी अर्धा तास विनवणी केल्यानंतर अखेर ती खाली उतरली आणि पोलीस अधिका-यांनी सुटेकचा नि:श्वास सोडला.
कविता आप्पाराव पवार (रा. वासनवाडी ता. बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. कुटुंबियांसमवेत ती चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली आहे. वासनवाडी येथील गायरान जमिनीचा कायमस्वरुपी ताबा मिळावा, गायरान नावचे करावे अशा स्वरुपाच्या तिच्या मागण्या आहेत. उपोषणास बसूनही प्रशासनाने साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी सात वाजता कविता पवार कार्यालय परिसरातील मोाबईलच्या टॉवरवर चढली. काही नागरिकांनी तिला टॉवर पाहिले अन तातडीने पोलिसांना कळविले. शिवाजीगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे हे फौजफाट्यासह तेथे पोहोचले. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनाही पाचारण केले होते.
निरीक्षक कस्तुरे यांनी महिलेला खाली उतरण्यास सांगितले; परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. अर्धा तास तिची विनवणी केल्यानंतर अखेर ती खाली आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन शिवाजीनगर ठाण्यात नेले. तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे निरीक्षक कस्तुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.