अहमदनगर : पांगरमल येथे राजकीय नेत्यांच्या रविवार रात्रीच्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या चार झाली आहे. घटनेस कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह सहा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे़ एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मद्यसेवनामुळे सोमवारी रात्री पोपट व दिलीप आव्हाड या भावांचा सोमवारी तर राजेंद्र आंधळे व प्रभाकर पेटारे यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ आव्हाड यांचे बंधू बबन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून जेऊर गणातून उमेदवारी करणारे मंगल आव्हाड व गटातून उमेदवारी करणाऱ्या भाग्यश्री मोकाटे यांच्यासह भिमराज आव्हाड, रावसाहेब आव्हाड, महादेव आव्हाड यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मंगल यांच्या घरी रविवारी पार्टीचे आयोज करण्यात आले होते़ त्यात देशी दारू देण्यात आली़ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते या पार्टीत सहभागी झाले होते़ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास काहींना त्रास सुरू झाला़ त्यांना उपचारासाठी नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ आदिनाथ आव्हाड, रावसाहेब आव्हाड, हरिभाऊ आव्हाड, महादेव आव्हाड, राजेंद्र आव्हाड, भास्कर आव्हाड यांची प्रकृती चिंताजनक आहे़ (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या दारुमुळे नगरमध्ये चौघांचा मृत्यू
By admin | Published: February 15, 2017 3:17 AM