ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यअहवालावर छापले गेल्यामुळे सिवसेना-मनसेमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखांनी पोलिसांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मनसेचे दादरमधील नगरसेवक सुधीर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांतील कामाचा 'कार्यअहवाल' प्रसिद्ध केला. त्याच्या सुरूवातील प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे तसेच मीनाताई ठाकरे यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. तलेच अखेरच्या पानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतानाचे छायाचित्र छापण्यात आले आहे. शिवसेनेच्या संस्थापकांची छायाचित्र छापल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली असून नगरसेवक जाधव यांनी वस्तू वाटल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
जाधव यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. ' शिवसेनाप्रमुख लोकनेते आहेत, ते फक्त सेनेचे नेते नाहीत. . डॉ. अब्दुल कलाम, ज्योतिबा फुले यांच्यासोबत मी त्यांचे छायाचित्र छापले, यात काय चुकले?' असा प्रश्न सुधीर जाधव यांनी विचारला. तसेच ' नगरसेवक पद गेले तरी चालेल पण मी बाळासाहेबांना हृदयातून काढणार नाही' असेही त्यांनी नमूद केले.