महाड : राज्य शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असला, तरीही अद्याप समाजाची या अनिष्ट प्रथेतून सुटका झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून जातपंचायती आणि वाळीत प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील वलंग विठ्ठलवाडीवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे ग्रामस्थांना गावातील विठ्ठल मंदिरात जाण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे.९७ वर्षांपासून साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्यापूर्वी एका समाजाच्या ओवळे गटाने २४ गावांत बोली निरोप देऊन बहिष्कार टाकल्याचे आदेश दिले. त्यामुळे सप्ताहात सलग तीन- चार दिवस आजूबाजूच्या गावातील कोणीही भक्त आले नसल्याने या सप्ताहावर बहिष्कार टाकल्याची कुणकुण लागली. हभप जनार्दन महाराज धाडवे हे या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक असून त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. उत्सव झाल्यानंतर याबाबत कायदेशीर तक्र ार करणार असल्याची भूमिका धाडवे यांनी व्यक्त केली. मुंबईस्थित जुईचे ग्रामस्थ दत्ता देवळे यांनी या सप्ताहावर बहिष्काराची बातमी समजल्यानंतर तडक विठ्ठलवाडी गाठली आणि तेथील ग्रामस्थांना धीर दिला. यापुढे जातपंचायतीची पद्धतच आपण बरखास्त करण्यासाठी समाजापुढे आग्रह धरू, अशी ग्वाही दत्ता देवळे यांनी विठ्ठलवाडी ग्रामस्थांना दिली. (वार्ताहर)
बहिष्कारामुळे ग्रामस्थ विठ्ठलदर्शनापासून वंचित
By admin | Published: April 19, 2016 4:03 AM