मुंबई : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असणार आहेत. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर लावल्यास त्याचा परिणाम हा परीक्षांवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना सूट मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. खासगी शाळांमधील शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी शिक्षक परिषदेला दिले. निवडणुकांमध्ये शिक्षक नेहमीच सहभागी होतात, पण त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. तर त्याचवेळी दहावीच्या प्रात्यक्षिक आणि भाषेच्या तोंडी परीक्षा सुरू असणार आहेत. या काळात शाळेतील बहुतांश शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला पाठवल्यास परीक्षा घेणे, दुसरे वर्ग चालवणे हे शाळेला कठीण जाते.केंद्र, राज्य आणि सार्वजनिक उपक्रम, महानगरपालिका आणि अन्य आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. तरीही अनेकदा खासगी अनुदानित शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर जुंपण्यात येते हे निदर्शनास आणून दिले. एका शाळेतील बहुतांश शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी घेतात. असे करण्यात येऊ नये. गरज पडल्यास शाळेतील १५ ते २० टक्के शिक्षकांनाच कामासाठी घ्यावे, अशी मागणी केल्याचे शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देऊन परीक्षांचे व शाळेचे नुकसान होणार नाही तसेच शाळेतील संपूर्ण कर्मचारी न घेता कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याचेही बोरनारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
दहावी, बारावीच्या परीक्षांमुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचा बोजा कमी
By admin | Published: December 22, 2016 4:22 AM