लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लग्नात व्हिडीओ चित्रीकरण करण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून एका गटाने दुसऱ्या गटाला रेल्वे गाडीत घुसून महिलांसह सहा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात घडली. कुर्ल्यानजीकच्या माहूर येथे अंबरनाथ व विठ्ठलवाडीहून काही जण लग्न सभारंभासाठी गेले होते. विठ्ठलवाडीच्या गटाने अंबरनाथच्या गटाचा व्हिडीओ चित्रित केला. त्याला अंबरनाथच्या गटाने विरोध केला होता. वाद वाढू नये, म्हणून अंबरनाथच्या गटाने तेथून काढता पाय घेतला. ते पहाटेच्या गाडीने कुर्ल्याहून अंबरनाथला परतत होते. त्याच गाडीत विठ्ठलवाडीचा गट चढला. अंबरनाथच्या गटाला त्यांनी कल्याण स्थानकात गाठले. तेथे विठ्ठलवाडीच्या गटाने आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. गाडीत घुसून त्यांनी मोहन साळुंके, रवी सांगणे, राधा सोळंकी, ज्योती सोळंकी, विजय सांगणे, ज्योती सांगणे या सहा जणांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाल्याने, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार घडला, तेव्हा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कुठे होते, असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नातील व्हिडीओच्या वादातून राडा
By admin | Published: June 05, 2017 5:09 AM