सांगली : शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगलीत जोरदार तयारी सुरू असतानाच ह्यकोरोनाह्ण व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे सतर्कतेचा भाग म्हणून शासनाच्या सूचनेनुसार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व कार्यक्रम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीत शंभराव्या नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह, दीनानाथ नाट्यगृह तसेच राजमतीनगर येथील कल्पदु्रम क्रीडांगण या ठिकाणांची चर्चा झाली होती. कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक कार्यक्रम रद्द केले तर खर्चाचा भुर्दंड स्थानिक आयोजकांना बसणार होता.
त्याशिवाय राज्यभरातून अनेक कलावंत, रसिक या संमेलनास येणार असल्यामुळे आरोग्य विभागाने हे कार्यक्रम पुढे ढकलावेत, असे सांगितले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन केले होते. नाट्य परिषदेने दोनच दिवसांपूर्वी सांगलीतील सर्व कार्यक्रम जाहीर करून नियोजित तारखेस संमेलन होईल, असे सांगितले होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार हे कार्यक्रम लांबणीवर टाकले आहेत. त्यामुळे स्थानिक संयोजकांमधील संभ्रमावस्था दूर झाली आहे.